दहावी, बारावीसाठी परीक्षेत १० मिनिटे अतिरिक्त वेळ मिळणार !

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना १० मिनिटांचा अतिरिक्त वेळ वाढवून दिला आहे. महामंडळाने बुधवारी याबाबत घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी त्यामुळे पुरेसा वेळ उपलब्ध होणार आहे. मात्र त्याचवेळी परीक्षेच्या निर्धारित वेळेच्या १० मिनिटे आधी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिली जाणार नसल्याचे मंडळाने जाहीर केले आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका १० मिनिटे आधी विद्याथ्र्यांना दिली जात होती. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचून पुढील तीन तासांत उत्तरे लिहिण्याचे नियोजन करता येत होते. मात्र या १० मिनिटांच्या कालावधीत प्रश्नपत्रिका मोबाइलवरून प्रसारित झाल्याचे प्रकार समोर आले होते. तसेच गैरप्रकार घडले होते. या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच परीक्षा निकोप आणि कॉफी मुक्त वातावरणात पार पाडावी यासाठी निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे आधी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका न देण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता. त्याला पालक आणि विद्याथ्र्यांनी विरोध दर्शविला होता. तसेच विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहिण्यास पुरेसा वेळ मिळणार नसल्याची भूमिका पालकांनी घेतली होती.

पालक आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीची दखल घेत मंडळाने विद्यार्थ्यांना परीक्षेची वेळ १० मिनिटे वाढवून दिली आहे. मात्र त्याचवेळी प्रश्नपत्रिका १० मिनिटे आधी न देण्याचा निर्णयही मंडळाने कायम ठेवला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेनंतर १० मिनिटे अतिरिक्त वेळ मिळणार आहेत.

शिष्टमंडळाची भेट आणि दिलासा

राज्यातील दहावी आणि बारावीची परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी पालकांच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि राज ठाकरे यांच्यात चर्चाही झाली होती. त्यानुसार या शिष्टमंडळाने बुधवारी केसरकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत मनसेचे संदीप देशपांडे, अभिनव महाडिक यांच्यासह पालकांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. या भेटीनंतर त्यांनी परीक्षा देणाऱ्या विद्याथ्यांना अतिरिक्त वेळ देणार असल्याचे नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *