Screen Time For Kids

कसा कमी कराल मोबाईल स्क्रीन टाईम

मोबाईल नव्याने आला आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला. सुरुवातीचं कौतुक ओसरून आता त्याचे गंभीर परिणाम दिसायला लागले, इतके की स्क्रीन ऍडिक्शन सेंटर सुरू झाले. काही वर्षांपूर्वी क्वचित कधीतरी थोड्या वेळासाठी आई-बाबांचा मोबाईल मुलांना वापरायला मिळायचा. मात्र, कोरोनानंतर ऑनलाइन शिक्षण सुरू झालं आणि मुलांना स्वतःचा मोबाईल देणं गरजेचं झालं. शाळा नियमित सुरू झाल्यात. परंतु मुलांना मोबाईलचं व्यसनच लागलंय.

स्क्रीन ऍडिक्शनची अनेक कारणं आहेत. झोपून किंवा सतत खाली मान घालून तासनतास गेम खेळल्यामुळे पाठीचा कणा, मान यांचे त्रास सुरू झाले. स्क्रीन लाइटमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतो, चष्मा लागणं, पुरेशी झोप न झाल्यानं मुलं चिडचिडी झालीत. मैदानावर मोकळेपणानं खेळण्यापेक्षा मोबाईल घेऊन एका कोपऱ्यात बसणं जास्त आवडू लागलं.

मोबाईलचं व्यसन मुलांनाच नाही, तर मोठ्यांमध्येही दिसून येत आहे. स्क्रीन टाइम म्हणजे काय हे आपण पाहूया. सध्या डिजिटल माध्यम आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहेत. त्यामुळे दिवसभर आपण वेगवेगळे स्क्रीन सतत बघत असतो. कामासाठी, शाळांमध्ये वापरला जाणारा संगणक, टीव्ही, रस्त्यावर जागोजागी दिसणारे डिजिटल जाहिरात फलक आणि मोबाईल या सर्वांचा एकत्रित वेळ म्हणजे स्क्रीन टाइम.

स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी सात उपाय….

1. घरी गेलो की चप्पल स्टॅण्डवर काढून ठेवतो; सायकल, गाडीची किल्ला अडकवून ठेवतो. दप्तर, ऑफिस बॅग जागेवर ठेवतो तसाच एखादा ट्रे ठेवावा. त्यामध्ये घरातील प्रत्येक सदस्याने आपला मोबाईल ठेवावा. 

2. फ्रेश होऊन सगळ्यांनी एकत्र बसून चहा नाश्ता करताना दिवसभरातल्या गमती जमती सांगाव्यात. 

3. रात्री जेवताना कोणीही मोबाईल घ्यायचा नाही.

4. जेवणात केलेले पदार्थ, कशामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन आहे त्याची शरीराला असणारी गरज, आजी, आत्या, मावशी यांच्या हातचे आवडीचे पदार्थ, कधीकधी फसलेले पदार्थ, त्यामुळे झालेल्या गमती अशा अशा आनंदी वातावरणात गप्पा मारत केलेलं जेवणही अंगी लागेल. ‘एक घास चिऊचा… एक ‘घास काऊचा’ म्हणत बाळाला भरवणारी आई चिमुकल्याच्या समोर मोबाईलवर काहीतरी गाणी लावते आणि भराभर जेवण अक्षरशः कोंबते. ते बाळ जेवत, मात्र त्याचं पोट भरतं का? 

5. रात्री झोपण्यापूर्वी किमान १ तास कोणताही स्क्रीन बघायचा नाही.

6. प्रत्येक अँपमध्ये तुमचा स्क्रीन टाइम मोजण्याची सोय असते. त्याप्रमाणं आपण कितीवेळ आणि काय बघतो हे आपल्याला पाहता येईल व तसं नियोजन करून आपला स्क्रीन टाइम कमी करता येईल.

7. आपल्या नोटिफिकेशनचा साऊंड सर्वांत आधी बंद करायचा. कारण आवाज आला, की आपण लगेच मोबाईल बघतोच. व्यसन कमी करण्याचा हा सर्वप्रथम आणि सोपा उपाय.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *