वंदना फडके- वय वर्षं ५२. नुकत्याच ३१०० किलोमीटर चालून नर्मदा परिक्रमा

वंदना फडके- वय वर्षं ५२. नुकत्याच ३१०० किलोमीटर चालून नर्मदा परिक्रमा करून आल्या. ११ नोव्हेंबर २०१९ या दिवशी सुरूवात करून १२६ दिवसात त्यांनी ही परिक्रमा विनाव्यत्यय पार पाडली. नुसती पार पाडली एवढंच नव्हे तर अतिशय मजेत पार पाडली इतकी की परतत्ताना त्यांना हुरहूर वाटत होती की उद्यापासून या मजेला आपण मुकणार आहोत.

नर्मदापरिक्रमेतल्या त्यांच्या अनुभवांसाठी हा वार्तालाप.

■ प्रश्न : नर्मदापरिक्रमेला जावं असं तुम्हाला का आणि कधी वाटलं?

■ उत्तर : तसं गेली दहा वर्षं माझ्या मनात हा विचार घोळत होता, प्रतिभा चितळे यांचे परिक्रमेचे अनुभव मी यू ट्युबवर पाहत असे आणि आपणही असं का करू नये असं मला वाटत असे. अखेरीस आपल्या सांसारिक जबाबदार्‍या बर्‍यापैकी पार पाडल्यानंतर हे धाडस करावं असं सर्वानुमते ठरलं. मग मुलाचं लग्न झालं, यजमानांनी चार महिने स्वावलंबनाची तयारी दर्शवली आणि मी ठरवलं की आता हीच ती वेळ आपला मनोदय पुरा करण्याची. मग त्या दृष्टीने चौकशी सुरू केली. पाच-सात जणींचा ग्रुप जमला-सगळ्या मला अनोळखी होत्या-संपर्क ग्रुप बनवला आणि तयारी सुरू केली.

■ प्रश्न : त्यासाठी पूर्वतयारी काय केली?

■ उत्तर : परिक्रमा पूर्णपणे चालत करण्याचा माझा निश्चय होता. त्यामुळे बरोबर कमीतकमी ओझं असण्याची गरज होती. फक्त दोन पांढरे ड्रेस, आतले कपडे, स्लीपींग बॅग, थोडेसे गरम कपडे, थोडीशी औषधं, सुई-दोरा, पेन, डायरी, पाण्याच्या बाटल्या आणि इतर रोजच्या आवश्यक वस्तू मिळून दहा किलो वजन मला कायम बरोबर वागवायचं होतं. मुख्य म्हणजे हे वजन घेऊन चालायची सवय करायला हवी होती. मग पहिल्यांदा पंढरपूरच्या वारीला गेले. एकदा आळंदीला तर एकदा चिंचवडहून पुण्याला चालत गेले. शिवाय रोज पाच-सहा किलोमीटर चालण्याचा सराव ठेवला. माझं ओळखपत्र म्हणून आधारकार्ड आणि आमच्या भागातल्या नगरसेवकाकडून एक प्रमाणपत्र घेतलं.

प्रश्न : नर्मदा परिक्रमा म्हणजे काय आणि तुम्ही ती कोणत्या मार्गाने केली?

■ उत्तर : नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदेला प्रदक्षिणा. मध्यप्रदेश, गुजरात अणि महाराष्ट्र या तीन राज्यातून ही प्रदक्षिणेची वाट जाते. नर्मदा नदीच्या एका किनार्‍यावरून निघायचं, नर्मदेला नेहमीच उजवीकडे ठेवून शक्यतो तिच्या कडेकडेने चालत राहायचं. नर्मदा जिथे समुद्राला मिळते तिथे समुद्राच्या पाण्यातून पलिकडे नर्मदेच्या दुसर्‍या तीरावर जायचं आणि नंतर उगमाला वळसा घालून जिथून निघालो त्या ठिकाणी परतायचं. या प्रदक्षिणेचं वर्तुळ पुरं करण्यासाठी उगमापासूनच सुरूवात करावी लागते असं नाही. साधारणपणे नर्मदातीरावर असलेल्या ओंकारेश्वरापासून सुरूवात करतात. नर्मदा कुठेही ओलांडायची नाही हा नियम मात्र कटाक्षानं पाळावा लागतो. स्वतःचं सामान स्वतःच वाहून न्यायचं त्यासाठी कोणाचीही मदत घ्यायची नाही हेही महत्वाचं.

प्रश्न : या परिक्रमेचा मार्ग खडतर असेल ना? पण मग आपण हे धाडस करताना कधी भीती वाटली नाही?

■ उत्तर : मध्यप्रदेशातल्या ओंकारेश्वरापासून आम्ही परिक्रमेला सुरूवात केली, तिथलं नर्मदेचं जल आम्ही बाटलीत भरून घेतलं. नर्मदेला कायम उजवीकडे ठेवून चालायचं असल्यामुळे ही पाण्याची बाटलीही कायम उजव्या हाताला ठेवायची होती. त्यातलं अर्धं पाणी, नर्मदा जिथे समुद्राला मिळते त्या समुद्रात ओतून त्यात समुद्राचं पाणी भरायचं. परत अमरकंटकला उगमाजवळ आल्यानंतर त्यातलं अर्धं पाणी ओतून पुन्हा बाटली भरून घ्यायची आणि अखेरीस ओंकारेश्वरला परत आल्यावर तिथल्या पिंडीवर हे पाणी वाहायचं. एवढं झालं की परिक्रमेची सांगता झाली असं समजायचं.

तर आम्ही या ओंकारेश्वरापासून परिक्रमेला सुरूवात केली त्यानंतर शिरलो शूलपाणीच्या जंगलात.

पूर्वी या जंगलात वाटमारी करणार्‍या भिल्लांकडून धोके होते पण तिथल्या सरकारच्या प्रयत्नांनी या लोकांची मानसिकता बदलेली आहे. त्यामुळे लूटमार करण्याऐवजी हे आदिवासी परिक्रमा करणार्‍यांना मदतच करतात. शूलपाणीच्या जंगलाला नर्मदेचं हृदय म्हणतात त्यामुळे ते पार करून तर जावंच लागतं. हे जंगल चालत पार करायला जवळजवळ पाच दिवस लागले. त्यानंतर आम्ही पोचलो गुजरातमधल्या अंकलेश्वरला. तिथे नर्मदामाई समुद्राला मिळते. या समुद्रातून होडीने तीन चार तास प्रवास करून पलिकडे पोचलो.( नदी समुद्राला जिथे मिळते तिथलं पाणी थोडंसं गोडं असतं-पण नर्मदा ओलांडायची नसल्यामुळे थोडंसं दुरून म्हणजे खार्‍या पाण्यातून हा प्रवास होतो ) हे गाव म्हणजे भरूचजवळचं मिठीतलाई. त्यानंतर गरूडेश्वर, कोटेश्वर, अहल्याबाईंचं महेश्वर करीत करीत लक्कडकोटचं जंगल पार केलं. मग आलं नेमावर-नर्मदामाईचं नाभीस्थान. तिथून मध्यप्रदेशातल्या अमरकंटकला पोचलो. इथे नर्मदामाईचा उगम होतो. या उगमस्थानाला वळसा घालून माई की बगिया इथे पोचलो. इतर अनेक देवालयात जाऊन दर्शन घेतलं मात्र अमरकंटकच्या देवालयात प्रवेश करायचा नव्हता कारण हे देऊळ आहे नदीच्या पात्रात. तिथे गेलं की परत नदी ओलांडली असं होईल म्हणून.

या परिक्रमेच्या वाटेवर चार-पाच जंगलं लागतात, महाराजपूरचं जंगल पार करायला सुद्धा एकवीस किलोमीटर चालावं लागतं. यशिवाय कधी डोंगर चढून उतरायचे, कधी वाळवंटातून, कधी रेल्वे ट्रॅकवरून, तर कधी गव्हाच्या उभ्या शेतातून चालत राहायचं. नर्मदेला मिळणार्‍या अनेक उपनद्या आहेत, त्यात पाणी कमी असलं तर त्यातून चालत जायचं आणि पाणी जास्त असलं तर होडीतून पलिकडे जायचं. कधी चिखल तर कधी मगरीची भीती. माईवर भरवसा ठेवून बिनधास्त पुढे जायचं. हायवे न वापरता आतल्या रस्त्यांवरून मार्गक्रमणा करायची. वाटेत गावं लागतात, लोक भेटतात. ‘ नर्मदे हर ‘ हा परवलीचा शब्द. ही वाटचाल करताना वेगवेगळ्या हवामानाला तोंड द्यावं लागतं. कधी जीवघेणी थंडी, कधी चटचटणारं ऊन, तर कधी गारांचा पाऊस. यासाठी शारीरिक सुदॄढता तर हवीच शिवाय मानसिक बळ जास्त महत्वाचं. हे धाडस करण्यासाठी आत्मविश्वास तर हवाच पण समर्पणाची भावना हवी. खूप मंडळी हे धाडस करतात तेव्हा आपल्यालाही जमू शकेल अशी मला खात्री होती.

प्रश्न : तुमचा साधारण दिनक्रम काय होता?

■ उत्तर : सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालायचं हा मुख्य कार्यक्रम. त्यासाठी पहाटे चार-साडेचारला उठायचं, शरीराच्या नैसर्गिक मागण्या पुर्‍या करून नर्मदेच्या किंवा मिळेल त्या गार पाण्याने स्नान, मग नर्मदामैयाची पूजा झाल्यावर पुढे कूच करायचं. वाटेत कुठे तरी थांबून नाश्ता झाला की पुन्हा चालायला सुरूवात -ते जेवणाची वेळ होईपर्यंत चालत राहायचं. जेवणानंतर परत निघायचं ते जवळ जवळ सूर्य बुडेपर्यंत. मग पुन्हा नर्मदामाईची पूजा, जेवण आणि जिथे जागा मिळेल तिथे आपली पथारी पसरून झोपेच्या आधीन व्हायचं हा आमचा दिनक्रम.

साधारणपणे आमचा पाच- सहा माणसांचा ग्रुप असायचा. पण दर वेळी तीच माणसं असतील असं नाही. कारण इथे चालताना कुणी कुणासाठी थांबत नाही. चालण्याचा वेग कमीजास्त असतो, कुणाची तब्येत बिघडते, त्यामुळे सुरूवातीला बरोबर असलेल्या सख्या नंतर पांगल्या. जे बरोबर असतील ते सहप्रवासी असणार. परिक्रमा हा एकच समान धागा. या वाटेवर लहान सहान खूप आश्रम आहेत. कुठल्याही आश्रमात गेलं की तिथे आपलं नाव-पत्ता यांची नोंद करायची आणि आपल्या डायरीत त्यांचा शिक्का मारून घ्यायचा. त्याचं एक कारण म्हणजे आपण कुठे कुठे राहिलो याची आपल्याला आठवण राहील. दुसरं कारण जरा वेगळं आहे. हल्ली मोबाईलची सोय असल्यामुळे कुठूनही कसाही संपर्क होऊ शकतो, पण पूर्वी परिक्रमेतल्या माणसाचं काय झालं हे घरच्या माणसांना कळणं कठीण होतं. परिक्रमेच्या मार्गावर असलेल्या या नोंदींमुळे त्या व्यक्तीचा माग काढणं सहज शक्य होतं. या आश्रमात परिक्रमवासीयांची जेवणाची, राहण्याची सोय सहज होत असते. कुणीही कधीही येत असतात. तिथली एक गंमतीदार प्रथा सांगते. आपण तिथे पोचलो की तिथला माणूस तुम्हाला सांगतो, ” माताराम, अपना आसन लगाईये. ” म्हणजे तुमची पथारी तिथल्या एखाद्या जागी तुम्ही पसरायची. एकदा ती पसरली की तुमची जागा पक्की. त्यानंतर येणारा माणूस ती जागा मागू शकणार नाही. अर्थात ही जागा औटघटकेची असते- जेवणापुरतं तास-दोन तास किंवा रात्री झोपण्यापुरती ही जागा वापरायची असते.

काही आश्रमात कोरडा शिधा देण्याची सोय असते. तो मिळाला की तीन दगडांची चूल पेटवून तिथे असतील तितक्या माणसांसाठी सर्वांनी मिळून स्वयंपाक करायचा, जेवायचं, भांडी घासून, सगळं आवरून पुढच्या मुक्कामासाठी निघायचं.

■ प्रश्न : म्हणजे चालताना तुमच्या बरोबर कुणी असेलच असं नाही मग रस्ता कसा सापडायचा?

■ उत्तर : तसं कुणीतरी मागेपुढे असायचंच. बहुधा पाच सहा जण तरी मागेपुढे असायचेच. इतक्या चार महिन्यात मी फक्त अर्धा दिवस एकटीच चालत होते. चालताना एकतर नामस्मरण करीत राहायचं. नाहीतर मनात विचार तर येतातच. तशी वाटेत लागणार्‍या गावांची यादी माझ्याकडे होती. तरीही रस्ता चुकण्याची धास्ती होतीच. अशा वेळी नुसता ‘ नर्मदे हर ‘चा गजर केला की आजुबाजुला जे कोण असेल ते तुमच्या मदतीला धावून येतात असं ऐकलं होतं आणि ते पूर्णपणे खरंही होतं. एकदा मी चालता चालता बरीच पुढे गेले. पुढे रस्ता दिसेना मग ‘ नर्मदे हर ‘ चा घोष सुरू केला कुठूनतरी एकजण धावत आला आणि मला रस्ता सापडला. तसंच एखाद्याला घरी निरोप द्यायचा आहे पण फोन चालत नाही तर तुम्ही कुठल्याही येणार्‍या-जाणार्‍याला फोन करायला सांगितलं तर तो काहीही करून आवर्जून केला जाईल हे नक्की.

■ प्रश्न : नर्मदेची पूजा, गार पाण्याने स्नान, चालणं हे मी समजू शकते पण नाश्ता, जेवण, चहा बद्दल तुम्ही असं सांगताय की जशी काही ठिकठिकाणी तुमची सोय आधीच कुणीतरी करून ठेवली होती-

■ उत्तर : नर्मदापरिक्रमेतला तोच तर अनुभव विशेष सांगण्यासारखा आहे. साधारणपणे आपण कुठेही ट्रीपला गेलो की हॉटेलमधला मुक्काम, जेवणखाण यांची सोय आगाऊ करावी लागते, शिवाय जवळ पैसे बाळगावे लागतात, याउलट परिक्रमेतली पहिली गोष्ट म्हणजे परिक्रमावासी स्वतःजवळ पैसे बाळगत नाही, वाटेत जे कुणी खायला देईल त्यावरच त्याने गुजराण करायची हा नियम. नर्मदेच्या परिसरातल्या सगळ्या गावागावातून राहणार्‍या तमाम जनतेच्या मनात नर्मदामाई आणि तिचे परिक्रमावासी यांच्या बद्दल इतकी आदरभावना आणि प्रेम आहे की परिक्रमा करणार्‍याला ते आपल्या घासातला घास काढून देतात. याचा पूरेपूर प्रत्यय मला आला. परिक्रमावासींचा एक ठरावीक पोशाख असतो. तो पाहिला की लहान-थोर सगळे त्यांच्या पाया पडतात, त्यांना आग्रहाने घरी नेतात, राहायला जागा देतात, प्रेमाने खाऊ घालतात, त्यांची सेवा करायला तत्पर असतात. या चार महिन्यांच्या काळातल्या माझ्या प्रवासात एकदाही असं घडलं नाही की मला चहा-जेवण-नाश्ता मिळाला नाही. उलट गेल्या दोन-चार वर्षात खाल्ल्ली नसतील इतकी श्रीखंड, बासुंदी, खीर, गुलाबजाम अशा प्रकारची पक्वान्नं मी या काळात खाल्ली. हॉटेलमध्ये खाल्लं तर मालक पैसे नाकारायचा. डेअरीतनं दूध घेतलं तर डेरीवाला पैसे घ्यायचा नाही. का ? तर आम्ही परिक्रमा म्हणजे नर्मदामैयाची सेवा करतोय. तिथल्या राजकारणी, सरपंच यांच्यापासून अगदी झोपडीत राहणार्‍या गरीब माणसांपर्यंत ही भावना सारखीच होती असं मला जाणवलं. नाश्त्यासाठी बालभोग असा सुरेख शब्द मला तिथेच सापडला.

तिथले स्थानिक लोक भेटले की ते पहिल्यांदा माताराम म्हणून पाया पडायचे आणि हातावर पैसे, बिस्किटांचे पुडे ठेवायचे. का तर आम्ही परिक्रमा करतोय, आम्ही पैसे बाळगत नाही मग आमची खाण्यापिण्याची सोय करणं हे त्यांचं नुसतं कामच नव्हे तर तीही नर्मदामाईची सेवाच आहे असा त्यांचा समज आहे. हा सेवाभाव शेकडो वर्षांपासून पिढ्यानपिढ्या तिथल्या गावागावातल्या लोकात मुरलेला आहे.

एकदा माझ्या बोलण्यातून तिथल्या लोकांना कळलं की माझा वाढदिवस आहे. एकजण माझ्यासाठी जिलबी घेऊन आला आणि मला आग्रहाने खाऊ घातली. त्यामुळेच मला कधी ना पोटाची पंचाईत पडली ना रात्रीच्या मुक्कामाची. कधी आश्रमात, कधी एखाद्याच्या दोन खण खोलीत, कधी पत्र्याच्या शेडमध्ये तर कधी गोठ्यातही मी झोपलेली आहे. दिवसभराच्या चालण्याने झोपेची आराधना करण्याची गरजच भासत नसे, लोकांच्या निर्मळ आतिथ्यामुळे असं झोपणं माझ्यासारख्या बाईला सुरक्षित आहे की नाही अशी शंकाही कधी मनात आली नाही. धार्मिक भावनेतून निर्माण होणारं इतकं शुद्ध सामाजिक वातावरण आणखी कुठे पाहायला मिळेल की नाही अशी शंका येते.

तसं पाहिलं तर कुठलीही नदी तिच्या भोवतालच्या परिसरात राहणार्‍यांसाठी जीवनदायिनी असते पण तिच्या काठी राहणार्‍या लोकांमध्ये हा निरपेक्ष सेवाभाव, सचोटी आणि नीतीमत्ता असते का? मग ती नर्मदेकाठीच कुठून आली? परिक्रमेच्या वाटेवर असणार्‍या मंदिरांना खूप मोठा इतिहास आहे, धार्मिक परंपरा आहे. मार्कंडेय ऋषींनी नर्मदापरिक्रमेची सुरूवात केली. असं म्हणतात की ९९९ लहानमोठ्या नद्या नर्मदेत सामावल्या जातात. यापैकी कुठलीही नदी न ओलांडता ते परिक्रमा करीत असत तब्बल २७ वर्षं. त्यानंतर नर्मदा परिक्रमेची प्रथा पडली.

■ प्रश्न : जंगलातून, वाळवंटातून, उन्हात, थंडीतही तुम्ही रोज सरासरी पंचवीस मैल चालत होता. त्यात एकही दिवस खंड पडला नाही. पण रोजचा मुक्काम वेगळ्या ठिकाणी, खाणं-पिणं जे मिळेल ते, बरोबर ओळखीचं कुणी नाही, ठिकठिकाणी भेटतील ती माणसं- हे सगळं तुम्ही झेपवलं-कशाच्या बळावर? कधी पाय दुखले, दमायला झालं, तब्येत बिघडली असं कधी झालं का?

■ उत्तर : आपण इथे शहरात चांगल्या रस्त्यांवर चालतो, चार-पाच किलोमीटर म्हणजे फार झालं-लगेच दमायला होतं. तिथे तर धड रस्ताही नसायचा, कधी दगड-माती, चिखल, चढण, काटेकुटे असलेल्या रस्त्यांवर मी दिवसभर चालत असायची, हातात काठी आणि तोंडाने नामस्मरण-तुम्हाला सांगून खरं वाटायचं नाही पण जिथे कुठे झोपले असेन तिथे पहाटे चार वाजता उठल्यावर आदल्या दिवसाचा शीण पार पळालेला असायचा. तिथे असं म्हणतात की नर्मदामैय्या हे सगळं आपल्याकडून करून घेते. पण मला वाटतं ही उर्जा मला तिथल्या निसर्गाकडून मिळत होती. शुद्ध हवा आणि डोळ्यात साठवून ठेवावं असं अप्रतिम निसर्गसौंदर्य. अर्थात मी ते माझ्या कॅमेर्‍यात साठवून ठेवत होते. माझा आत्मविश्वास तर होताच शिवाय स्थानिक लोकांचा आपलेपणा आणि सहकार्याची भावना मला अधिक बळ देत होती. आश्रमातला सेवाभाव, तिथे चालणारं अखंड रामायणाचं वाचन, सकाळी ढोल घेऊन गावातून काढलेली प्रभातफेरी यामुळेही मन प्रसन्न होत होतं.

इतक्या चार महिन्यात फक्त एकदाच माझं पोट बिघडलं होतं. तेव्हा तिथल्या आश्रमातल्या बाबाजीनी मला प्रेमाने लिंबाचं सरबत दिलं. पुढे जाण्यासाठी उर्जा मिळाली.

परिक्रमेत किंवा नंतर अनेकांच्या पायाला फोड येतात

मला तसं काहीही झालं नाही फक्त मी घालत असलेले सॅंडल्स मला बदलावे लागले. माझ्या यजमानांनी मला नवे सॅंडल्स कुरिअरने पाठवले होते.

हल्ली ही परिक्रमा थोडी बसने, थोडी चालत केली जाते-तिथली ठिकाणं बघणं हाही एक उद्देश असतो. मुख्य म्हणजे एवढं चालण्याची क्षमता नसते. त्यातही जे चालत परिक्रमा करण्याचा संकल्प करतात आणि सुरूवात करतात त्यापैकी साधारणपणे दहा टक्के ती यशस्वीरित्या पूर्ण करतात. बाकीच्यांना काही ना काही कारणाने मध्येच सोडून द्यावी लागते. मी या दहा टक्क्यात आहे याबद्दल मला निश्चित समाधान वाटतं.

■ प्रश्न : नर्मदापरिक्रमेवर अनेकांनी पुस्तकं लिहिली आहेत, त्यात मारूतीचं दर्शन झालं, अश्वत्थामा भेटला, नर्मदामाई मला कन्येच्या स्वरूपात दिसली, मला हवी असलेली वस्तू अरण्यात एकदम माझ्यासमोर आली अशा अनेक चमत्कारांचं वर्णन केलेलं असतं. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे?

■ उत्तर : अशा प्रकारचं काही घडेल असं मला जाण्याआधी वाटत नव्हतं आणि तसा काहीही अनुभव मला आला नाही. अर्थात माझ्या सारखी एखादी बाई कसलीही भीती न बाळगता, रानावनातून एकटी चालते, कुठेही बिनघोर शांत झोपू शकते, तिच्या उदरनिर्वाहाची काळजी आपोआप कुणीतरी प्रेमाने घेतं याला आजच्या नीतीमूल्यं हरवलेल्या जगात जर कुणी चमत्कार म्हणणार असेल तर माझी त्याला हरकत नाही. त्यामुळे अशा तथाकथित चमत्कारांची अपेक्षा मी कधीच ठेवली नव्हती. हा विलक्षण अनुभव मला अतिशय डोळसपणे घ्यायचा होता.

■ प्रश्न : आता तुम्ही ही नर्मदा परिक्रमा यशस्वीपणे करून परत आला आहात. तुम्हाला कसं वाटतंय?

■ उत्तर : मी ठरवलं तर अशक्य वाटणारी गोष्टही करू शकते हा आत्मविश्वास मला नक्कीच मिळाला आहे. तुम्हाला ऐकल्यावर आश्चर्य वाटेल पण या चार महिन्यात माझं वजन १४ किलोनी कमी झाल्ं, तरीही मी एकदम फीट आहे, शेवटच्या दिवशीसुद्धा मी जवळजवळ ३७ किलोमीटर चालले- माझा १० किलोचा संसार पाठुंगळी घेऊन.

दुसरी गोष्ट-चार महिने एक सॅक एवढाच माझा संसार होता आणि माझं कशावाचून अडत नव्हतं. तेव्हा आपल्या संसारातल्या शेकडो वस्तू मला निरर्थक वाटायला लागल्या. या वस्तुंमध्ये इतकी वर्षं आपण उगीच अडकून पडत होतो असं आता मला वाटतंय. या सांसारिक गोष्टींबद्दल एक प्रकारची अलिप्तपणाची भावना माझ्या मनात निर्माण झाली.

या परिक्रमेत मला जवळजवळ ८५०लहान मोठी गावं लागली. बुवासंन्याशांपासून गावातल्या पुढार्‍यांपर्यंत आणि श्रीमंतांपासून दरिद्री झोपडीवासियांपर्यंत लोक मला भेटले, त्यांची राहणी बघितली, त्यांचं आतिथ्य अनुभवलं. आपल्याबरोबर चालणारी, जेवणारी व्यक्ती; आपल्याला खाऊ घालणारी, आमच्या घरात राहायला या असं म्हणणारी माणसं कोण-त्यांची जात काय-त्यांची नावं काय हे जाणून घेण्याची गरजच मला कधी वाटली नाही. आणि त्यांनी देऊ केलेलं अन्न आणि आसरा देण्यात त्यांचा काही गैर हेतू असेल अशीही शंका मला कधी आली नाही. आपल्या नेहमीच्या जगापेक्षा हे खूप वेगळं होतं, पण ते खरं होतं-निर्मळ होतं-शुद्ध होतं. त्यामुळे आपोआपच माझी दृष्टी विशाल झाली. मध्यप्रदेशातली तरूण मंडळी त्याच मातीत राहून तिचं ऋण फेडताना मला दिसली. देशाटन केल्यामुळे शहाणपण येतं म्हणतात. माझं अनुभवविश्व मात्र यामुळे नक्की समृद्ध झालं.

मी चालत असताना बहुधा नामजप करायची पण तरीही मनात विचार यायचेच. जुन्या आठवणी यायच्या, एकेक प्रसंग, घटना डोळ्यासमोर आल्या की त्या त्यावेळी इतर आपल्याशी कसे वागले, आपलं त्यावेळी काही चुकलं का असं वाटायचं. इतक्या वर्षांच्या आयुष्यात आपल्या संपर्कात आलेले नातेवाईक, मैत्रिणी, शेजारपाजारची यांच्या अनेक आठवणी डोक्यात गर्दी करायच्या. या सगळ्या आठवणींतून आपोआप आत्मपरीक्षण होत गेलं. मग वाईट आठवणी आता नकोच- पूर्वी कधीतरी झालेली भांडणं, कुणाचेतरी जिव्हारी लागलेले शब्द विसरूनच जाऊया आणि फक्त चांगल्या आठवणी जपून ठेवूया अशी मनाची साफसफाई करण्याची गरज वाटायला लागली. मला वाटतं अगदी एकटं असण्याचा हा एक फायदाच आहे. आपल्याला अंतर्मुख व्हायला मदत होते.

आपल्याला विशेषतः बायकांना असं नेहमी वाटत असतं की आपण नसलो तर इतरांचं अडेल. मी घरात नसताना माझ्या यजमानांनी स्वतःला आणि घराला अतिशय व्यवस्थितपणे सांभाळलं होतं. त्यामुळे मी नसले तरी त्यांचं काही अडणार नाही असा साक्षात्कार मला झाला त्याचबरोबर मीही स्वतःला समर्थपणे संभाळू शकेन असा एक विश्वासही माझ्या मनात निर्माण झाला.

आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे. मी ही परिक्रमा पूर्ण करू शकले याचं श्रेय माझ्या यजमानांना द्यायला हवं. त्यांनी चार महिने एकटं राहायची तयारी दाखवली आणि मला जायला प्रोत्साहन दिलं एवढंच याचं कारण नाही. इतरांचे पती परिक्रमा करणार्‍या आपल्या पत्नीला सांगतात की तुला कठीण वाटलं तर परत ये. उगीच त्रास करून घेऊ नको. पण माझ्या यजमानांनी मला निक्षून सांगितलं, ” परिक्रमा थोडी सावकाश झाली तरी चालेल, गरज वाटली तर कुठेतरी थोडी विश्रांती घे आणि पुढे जा पण- परिक्रमा पूर्ण झाल्याशिवाय घरी यायचं नाही. ” या प्रेमाच्या दटावणीने मला वेगळीच उर्जा मिळाली. माझ्याकडे मोबाईल, फिटबिट सगळं होतं. बहुधा रोजच संपर्क होता, प्रोत्साहनाचं टॉनिक मला दररोज मिळत होतं, मी सतत फोटो पाठवीत होते. त्यामुळे मी जेव्हा शरीराने परिक्रमेत होते तेव्हा माझे यजमान मानसिक परिक्रमा करीत होते. त्यामुळे माझ्या या प्रवासातली खडानखडा माहिती ते सांगू शकतात.

■ प्रश्न : परिक्रमेला परत जाण्याचा तुमचा विचार आहे का?

■ उत्तर : नक्कीच. दोन वर्षांनी परत जाण्याचा माझा विचार निश्चितच आहे. या वेळी पहिलाच अनुभव असल्याने अनेक ठिकाणी मला चाचपडायला झालं, सगळं नीट होईल की नाही अशी थोडी धागधुग होतीच. काही गोष्टी माहिती नव्हत्या, त्या आता कळल्यामुळे या अनुभवाचा फायदा मला पुढच्या वेळी मिळेल आणि अधिक सहजपणे मी ते करू शकेन असा मला विश्वास आहे.

– माताराम वंदना फडके ©

(परिक्रमा करण्यार्‍या स्त्रीला आदराने माताराम असं संबोधलं जातं.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *